- मातंग समाज, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांचा मला खुला पाठींबा
- पिंपरीचे अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांचा यल्गार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना हा पक्ष मावळ लोकसभेचे खा. श्रीरंग बारणे यांच्या ताटाखालचं मांजर बनला आहे. खा. आपल्या मनप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करतात. ज्या ठिकाणी पक्ष बलाढ्य आहे, त्या ठिकाणी कमकुवत पदाधिकारी नेमून पक्ष खिळखिळा करण्याचा उद्योग करीत आहेत. त्यांच्या या कारभाराला शिवसेनेतीलच जातिवंत निष्ठा असलेले शिवसैनिक वैतागले असून, पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. खासदारांनी या बाबीकडे दुर्लक्ष करीत पाच वर्ष निष्क्रिय राहिलेले आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी देऊन, उरलासुरला पक्ष संपविण्याचे कारस्थान रचले आहे. त्यामुळेच मी बंडखोरी करीत पिंपरी विधानसभेतून अपक्ष अर्ज भरला आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात दाखले यांनी म्हटले आहे की, विद्यमान खासदारांनी शहरातील पक्षाचा रिमोट ताब्यात घेऊन निष्ठावंत शेकडो शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी यांच्यावर अन्याय केला आहे. तसेच, स्वतःच्या व्यवसायात भागीदारी असणाऱ्यांना पक्षाचा पदाधिकारी नेमुन त्यांना उमेदवारी दिली आहे. मुळ शिवसेनेचा विचार बाजुला ठेऊन खासदार हे पक्षाला प्रायव्हेट लि. करण्याच्या नादात आहेत. तो रोखण्यासाठी नाराज शिववसैनिक व आजी-माजी पदाधिकारी यांनी मला प्रत्यक्ष भेटुन व फोनवरून संपर्क साधून उमेदवारी कायम ठेऊन धडा शिकवण्याचा आग्रह केला आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मातंग समाजाचे तब्बल ४५००० ते ५०००० मतदान आहे. त्यांचा मला बिनशर्त पाठिंबा आहे. तसेच खासदारांच्या कारभारामुळे वैतागलेले शिवसेनेतील नाराज पदाधिकारी व शिवसैनिक यांचाही मला खुला पाठिंबा आहे. त्यामुळे आकड्याचे गणित पाहता पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच त्यांचा पराभवही होऊ शकतो. त्यामुळे खासदारांना धडा शिकविण्यासाठी मी अपक्ष निवडणूक लढविणारच आहे, असा दावा दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.


















