- वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचाही निर्णय
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०१९) :- अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे.
या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सकाळी १०.३० वाजता सुरू झाले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.















