- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत दुबई आणि थायलंडमधून कारभार चालवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) आणि लूकआउट सर्क्युलर (LOC) च्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावरून त्याला ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील ऑनलाइन टास्क स्कॅम, हिंजवडी पोलीस ठाण्यातील शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक तसेच सायबर पोलीस ठाण्यातील कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेटचा उलगडा झाला.
तपासात आरोपी सौरभ उर्फ गणेश काळे याचा सहभाग समोर आला. तो दुबईमध्ये बसून भारतातील विविध बँक खात्यांची माहिती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग सुविधा आणि ‘म्युल अकाउंट्स’च्या माध्यमातून फसवणुकीतील रकमेची विल्हेवाट लावत असल्याचे निष्पन्न झाले. यासाठी त्याने दुबईत स्वतंत्र नेटवर्क उभारले होते. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासातून आरोपी चीनसह इतर परदेशी नागरिकांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले. टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध सायबर फसवणुकीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात येत होती.
आरोपीविरोधात पुरावे गोळा करून महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रत्यर्पण (Extradition) प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर इंटरपोलच्या मदतीने रेड कॉर्नर नोटीस आणि लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले. सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी दुबई सोडून थायलंडमध्ये गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध अधिक तीव्र करण्यात आला. अखेरीस बँकॉक विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ११ जून २०२६ रोजी त्याला भारतात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि तेलंगणा राज्यातील विविध सायबर गुन्ह्यांमध्येही आरोपीचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीविरोधातील मोठे यश मानली जात असून, सायबर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.














