न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील सेक्टर २२ येथे ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत बांधण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन ग्रहप्रकल्प देहूरोड रेडझोनच्या संरक्षित हद्दीत येतो का? हे पाहण्यासाठी रेडझोन हद्दीची मोजणी सुरु करण्यात आली आहे.
सेंट्रल अॅम्युनेशन डेपोच्या बाह्यसीमा भींतीपासून दोन हजार यार्डाची मोजणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सहाय्याने नगर भूमापन विभागाकडून सोमवार (दि. ३०) पासून मोजणी केली जात आहे. याबाबत भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मोजणी केली जात आहे.
महापालिकेचा निगडीतील सेक्टर २२ येथे ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत बांधण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन गृहप्रकल्प रेडझोनच्या हद्दीतून बाहेर यावा अशी महापालिकेची इच्छा आहे. आता देहूरोड सेंट्रल अॅम्युनेशन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार यार्डाची मोजणी केली जात आहे’. ‘या मोजणीत झोपडपट्टी पुनर्वसन गृहप्रकल्प रेडझोन हद्दीत येत आहे, असे दाखविले. दोन हजार यार्डाची हद्द निश्चित केल्यानंतर अडचण येईल. लोकांनी रस्त्यावर उतरुन मोजणी बंद करायला पाहिजे. परंतु, प्रत्येकजण आपले अंग झटकून मोकळा होत आहे’, असे रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी यावेळी सांगितले.















