न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. असे प्रकार पुढेही सुरूच राहिल्यास खासगी जागांच्या मोबदल्यात महापालिकेच्या तिजोरीतील १००० ते १५०० कोटी रुपये द्यावे लागतील. शहरातील प्रामाणिक करदात्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरविताना आर्थिक अडचण निर्माण होईल. याबाबत सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्येही वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यावर महापालिकेच्या स्थायी समितीने तोडगा काढला असून, आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी जागा विकासासाठी ताब्यात घेताना संबंधित जागा मालकांना मोबदल्याऐवजी (विकास हक्कांचे हस्तांतरण) टीडीआर देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असा ठराव पारित केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी हे होते.












