न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०१९) :- विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली भाजपा शहराध्यक्ष निवड आज जाहिर झाली. एकमेव अर्ज आल्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केली. आ. जगताप यांचा अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने तीन महिन्यांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू होती. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आमदार लांडगे यांचा एकमेव अर्ज आला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी लांडगे यांची बिनविरोध निवड जाहिर केली. याबाबत भाजपचे आमदार महेश लांडगे भाजपचे नूतन शहराध्यक्ष? या मथळ्याखाली एक जानेवारी रोजी न्यूज पीसीएमसीने वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त अगदी तंतोतंत खरे ठरले आहे.
यावेळी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लोक लेखा समितीचे अध्यक्ष अँड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे, निवडणूक अधिकारी मोरेश्वर शेडगे, प्रदेशच्या उमा खापरे, सरचिटणीस अमोल थोरात, शैला मोळक, रवी लांडगे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पक्षाने सोपविलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. संघटन वाढीबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे.












