आमदार महेश लांडगे गटाला यंदा स्थायी सभापतिपद?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्यासह भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोन असे एकूण आठ सदस्य स्थायीतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या १९ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासोबतच दोन वर्षे सदस्य राहिलेल्या आठ सदस्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामध्ये स्थायीचे सभापती विलास मडिगेरी, सदस्य राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे या भाजपाच्या तर गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आतापासून स्थायीच्या सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून संधी कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वेळा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना देण्यात आले आहे. तर महापौरपद आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांना देण्यात आहे. यावेळी महापौरपद चिंचवडकडे चालून गेल्यामुळे स्थायीचे अध्यक्षपद आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाला मिळणार हे निश्चित आहे. सध्या तीन नगरसेवकांची नावे निवड आघाडीवर असून महेश लांडगे यापैकी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.