- भाजपने परस्पर उद्घाटन उरकल्याची स्थानिक नगरसेवकाची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०१९) :- रावेत प्रभाग क्रमांक १६ मधील वाल्हेकरवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत एका स्थानिक नगरसेवकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून या चौकीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ मधील वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. येथील राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेऊन जागेसह इतर कामांसाठी मदत केली होती. मात्र, शेजारच्या प्रभागातील भाजपाच्या नगरसेवकांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते व पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या उपस्थितीत नुकतेच चौकीचे उद्घाटन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांसह कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलविण्याचे साधे औचित्यही न दाखविता दुजाभाव करण्यात आला होता.
याबाबत येथील स्थानिक नगरसेवकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून यामध्ये म्हटले आहे की, रावेतमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या चौकीचे उद्घाटन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री या नात्याने आपल्या हस्ते करावे, अशी आमची मागणी होती. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही बोलविण्याबाबत स्थानिक राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपाच्या शेजारील प्रभागातील काही नगरसेवकांनी कोणाला काहीही माहिती न होऊ देता आमदार लक्ष्मण जगताप यांना हाताशी धरून पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत चौकीचे उद्घाटन केले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि लोकप्रतिनिधींचा अवमान करणार आहे. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने आपल्या हस्ते या चौकीचे पुन्हा उद्घाटन करण्यात यावे. तसेच इतरांच्या प्रभागामध्ये नाहक राजकारण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी, असेही या नगरसेवकाने पवारांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.