न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- मिळकत कर थकविणाऱ्या खासगी नामांकित कंपन्या, उद्योग , शासकीय संस्था , कार्यालये , रुग्णालये , शाळा , महाविद्यालये , राजकीय पदाधिकारी , नेतेमंडळी , जागामालकांची यादी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यांतील मोठ्या थकबाकीदारांवर करसंकलन विभाग आणि मध्यवर्ती अतिक्रमण विरोधी पथकांच्या वतीने पोलिस बंदोबस्तात बुधवारपासून ( दि . २६ ) जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेने १ लाख व त्याहुन अधिक रकमेचा मिळकतकर थकीत असलेल्या मिळकतधारकांची यादी तयार केली आहे. त्यांना ७ दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकीसह मिळकतकर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांमध्ये सरकारी , निमशासकीय संस्था व कार्यालये आणि रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच शहरातील प्रसिद्ध कंपन्या , नामांकित शाळा , महाविद्यालये व शैक्षणिक संस्था , रुग्णालये , देवस्थान , महिला मंडळ , बचतगट . बांधकाम व्यावसायिक , हाउसिंग सोसायट्या , टेलिकॉम कंपन्या , जागामालक , पालिकेचे ठेकेदार यांचाही समावेश आहे.
तसेच राजकीय पदाधिकारी , नेतेमंडळी आणि त्यांच्या नातेवाइकांकडे थकबाकी असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे. ही कारवाई करसंकलन विभाग व मध्यवर्ती अतिक्रमण निर्मूलन विभागासह पोलिस व होमगार्डच्या बंदोबस्तात केली जाणार आहे. मोठी थकबाकी असलेल्यांची अनधिकृत बांधकामे प्रसंगी पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
सरकारी संस्था, कंपन्यांचा समावेश
केंद्र शासनाच्या हिंदुस्थान अॅन्टीबॉयोटिक्स कंपनीकडे कोट्यवधींची धकबाकी आहे. तर , सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ( सीआयआरसी ) , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी ) , पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण , जिल्हा शल्य चिकित्सक – जिल्हा रुग्णालय , पीएमपीएल , पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ( म्हाडा ) , बीएसएनएल , प्रादेशिक दूरसंचार प्रशिक्षण लाखोची थकबाकी आहे.












