न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवात मानाच्या विड्याचा लिलाव तब्बल तीस लाखांना झाला. संजय बबनराव बोराटे यांनी ही बोली लावली. मानाच्या विड्याप्रति असेली अफाट श्रद्धा या लिलावातून दिसून आली. मोशीतील नागेश्वर महाराजांच्या उत्सवास शिवरात्रीपासून सुरुवात झाली. रविवारी ( दि . २३ ) रोजी परंपरागत लिलाव पार पडला.
उत्सवात वापरल्या गेलेल्या व महाराजांचरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव ९५ लाखांच्या आसपास गेला. नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची असेली श्रद्धा लाखोंच्या बोलीतून दिसून आली. नागेश्वर महाराज सभामंडपात २३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून लिलावाला सुरवात झाली. मानाचे लिंबू योगेश काका गुलाव बोराटे यांनी ३ लाख ५१ हजार रुपयांना घेतले. मानाच्या ओटीचा लिलाव दिलीप किसन सस्ते यांनी अकरा लाख रुपये बोली लावून प्राप्त केली.
सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या शेवटचा मानाचा विड्याचा लिलाव सुरु झाला. लाखोंच्या बोली लागत असल्याने अनेकांनी श्वास रोखून धरला होता. अखेरीस हा मानाचा विडा संजय बबनराव बोराटे यांनी ३० लाख रुपये बोली लावून प्राप्त केला. उत्सवात एक तोळा सोन्याची अंगठी आल्हाट यांनी देवाला अर्पण केली होती. तिची लिलावात तब्बल ६ लाख ५५ हजार रुपये बोली लावली गेली. सीताराम बारणे यांनी ही बोली लावली. एका भाविकांने अर्पण केलेला छोटा चांदीचा भरीव नंदी, कळीची बादली व श्रीफळ भानुदास गुलाब आल्हाट यांनी ४१ हजार ५८५ रुपयांना बोली लावत प्राप्त केला.
उत्सवातील वस्तूंचा लिलावात पुकार करण्याचे काम केदारी कुटुंबातील नारायण केदारी, सागर नारायण केदारी, निखील नितीन केदारी हे करत आहेत. या तिघांचाही यंदा ग्रामस्थांच्यावतीने पोषाख, शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला. नागेश्वर महाराज यांच्या उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणी असते. त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी नागेश्वर महाराज सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व वस्तूंचा लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.












