न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेने आठवड्याचे कामकाज केवळ ५ दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार (दि. २९) पासून महापालिकेचे काम चालणार आहे. शासनाच्या १३ जून १९८५ च्या परिपत्रकान्वये राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला होता. शासनाचे सर्व प्रशासकीय कार्यालये एक सप्टेंबर १९८८ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतील, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
राज्य मंत्रिमंडळाच्या १२ फेब्रुवारी २०२० च्या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (दि. २४ ) परिपत्रक काढून राज्यातील सर्व महापालिकांना त्या संदर्भात अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
हे परिपत्रक सोमवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्राप्त झाले आहे. शासन निर्णयानुसार ५ दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. दर शनिवारी व रविवारी महापालिकेस सुटी असणार आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयाचे कामकाज सोमवारी ते शुक्रवारी सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ६. १५ असे चालणार आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.















