न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते सफाईचे काम यांत्रिकी पद्धतीने ( रोड स्वीपर मशिन ) करण्याची निविदा काढली आहे. या सदंर्भात सोमवारी (दि. २४) झालेल्या बैठकीत निविदा रद्द करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या पिंपरी चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनने दोन दिवसानंतर काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील ६ , १२ , १८ मीटर आणि त्यापेक्षा अधिक रूंद असलेल्या सर्व रस्त्यांची सफाई रोड स्वीपर मशिनने केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या कामामुळे शहरातील तब्बल १ हजारपेक्षा अधिक कामगार बेकार होणार आहेत. ही निविदा रद्द करून पूर्वीप्रमाणे केवळ मुख्य रस्त्यावर स्वीपर मशिनने सफाई काम केले जावे. या मागणीसाठी पिंपरी – चिंचवड स्वयंरोजगार फेडरेशनच्या वतीने गुरुवारी ( दि . २० ) पालिका भवन प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आयुक्त हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक सुलभा उबाळे, फेडरेशनचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, सचिन गोरखनाथ पवार, संचालक प्रल्हाद कांबळे, सविता खराडे व अधिकारी उपस्थित होते.
या संदर्भात आयुक्त हर्डीकर म्हणाले की, सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात निर्णय घेता येईल. महापौर व इतर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना भेटा त्यांनी मान्यता दिल्यास तसा निर्णय घेतला जाईल, असे उत्तर त्यांनी दिले. आयुक्तांच्या उत्तरामुळे संतप्त झालेल्या पिंपरी – चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात एकूण ६९ स्वयंरोजगार संस्थेचे एकूण १ हजार ८०० कामगार सहभागी होणार आहेत. शहर अस्वच्छ झाल्यास त्यांची जबाबदारी आयुक्तांवर राहिल, असा इशारा फेडरेशनने दिला आहे.















