- या प्रकरणाची चौकशी होउन दोषींवर कठोर कारवाई करावी – मारुती भापकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात १७ व्हेंटिलेटर आणि ४० मल्टिपॅरा मॉनिटर्स खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, शहरातील करदात्यां नागरीकांच्या जीवीताशी संबंधीत आहे. पुरविण्यात आलेल्या मल्टिपॅरा मॉनिटर्सच्या दर्जाबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होउन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या पत्राची प्रत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही पाठविली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात १७ व्हेंटिलेटर्स आणि ४० मल्टिपॅरा मॉनिटर्स बसविण्याचा ठेका कोल्हापुर येथील मे. युका डायग्नोस्टीक्स या ठेकेदाराला देण्यात आला आहे. व्हेंटीलेटर्स टेक मी.टी.एस. या कंपनीचे आणि युएस एफडीए प्रमाणित असने आवश्यक असल्याची अट निविदेत होती. मात्र “युका डायग्नोस्टिक्स” यांनी पुरविलेले व्हेंटिलेटरचे मॉडेल युएस एफडीएच्या वेबसाईटवर प्रमाणित असलेले नाही. महापालिकेची फसवणुक करण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे व्हेंटीलेटर्स महापालिकेला पुरविण्यात आले असुन यात महापालिकेची कोट्यवधी रूपयांची फसवणुक झाली आहे. यासाठी पुरविण्यात आलेल्या मशिन्स योग्य कंपनीच्या असल्याचे भासविण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या नावाचे स्टिकर्स लावुन व्हेंटीलेटर्स योग्य कंपनीचे असल्याचे भासविले आहे. ही उपकरणे ताब्यात घेणाऱ्या वायसीएमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
एका व्हेंटीलेटर्सची किंमत र. रू. १५ लाख ५० हजार असुन एकुण खरेदी १७ व्हेंटीलेटरची किंमत र.रू. २ कोटी ६३ लाख ५० हजार इतकी होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. शिवाय हे व्हेंटीलेटर्स ठेकेदार व कंपनीच्या अधिकृत इंजिनियर्सनी बसविणे आवश्यक होते. तशी अट निविदेत आहे मात्र व्हेंटीलेटर्स कंपनीच्या इंजिनियर्सनी येउन बसविलेले नाहित. त्यामुळे भविष्यात वॉरंटीचा मुद्दा उपस्थित होणार आहे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
मे. युका डायग्नोस्टिक्स या कंपनीने यापुर्वी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात ४० मल्टीपॅरा मॉनिटर्स ४० ते ५० दिवसांपुर्वी पुरविले आहेत मात्र त्यापैकी सुमारे ३ ते ५ मल्टिपॅरा मॉनिटर्स आत्ताच बंद पडलेले आहेत. यामुळे त्या पुरविण्यात आलेल्या मल्टिपॅरा मॉनिटर्सच्या दर्जाबाबतही प्रश्ननिर्माण होत आहे. मल्टिपॅरा मॉनिटर्सच्या एका नगाची किंमत र.रू.२ लाख ८० हजार रूपये असून एकूण किंमत र.रू कोटी १२ लाख इतकी होते ही रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली असून उपकरणाचा दर्जा पाहता या मध्येही भ्रष्टाचार झाला आहे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे साहित्य वायसीएम रूग्णालयाला पुरवुन ते योग्य दर्जाचे व निविदेतील वर्णनाप्रमाणे आहे असे वायसीएम रूग्णालयाचे डॉ. राजेंद्र वाबळे यांनी लिहुन द्यावे व व्हेंटीलेटरचे बिल तात्काळ मंजुर करावे म्हणुन त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याचे समजते. या मागे राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नगरसेवकांचा हात असल्याचे कळते, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून शहरातील करदात्यां नागरीकांच्या जीवीताशी संबंधीत आहे. त्यामुळे आपण त्वरीत स्वत: लक्ष घालुन त्रयस्थ यंत्रणेकडुन या प्रकरणाची त्वरीत निष्पक्ष चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाउ नये. तसेच यामध्ये जबाबदार अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे पदाधिकाऱ्यांवर त्वरीत पोलिसात तक्रार दाखल करावी. आपण या पत्राची त्वरीत दखल घेउन कारवाई न केल्यास सध्या सुरू असलेल्या अंदाजपत्रकीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधितांकडे हे प्रकरण सोपविण्यात जाईल. वेळप्रसंगी आपल्या विरोधात न्यायालयातही दावा दाखल केला जाईल, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.













