न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराला देशाची औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. शहरातील युवकांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी फेस्टिवल ऑफ फ्युचर या उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ऑटोक्लस्टर, चिंचवड येथे दि. २८ व दि. २९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवल ऑफ फ्युचर या महोत्सवामध्ये सहभागी स्पर्धकांना त्यांच्या विविध नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी महानगरपालिकेकडून ९ लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नगरससदस्य मोरेश्वर शेडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, गरज हि उद्योगाची जननी असते. कोणताही व्यवसाय करताना जिद्द महत्वाची असते. थोर शास्त्रज्ञ थॉमस एडिसन देखील अनेक वेळा अपयशी ठरले पण म्हणून त्यांनी हार मानली नाही. अशिक्षित लोकं देखील उत्तम मार्गदर्शन करू शकतात. शेती व शेतकरी सक्षम होणे देखील आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, फेस्टिवल ऑफ फ्युचर सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व तरुणाईला नवीन दिशा प्राप्त होण्यास मदत होईल. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात एक चांगला उद्योजक होण्यास निश्चितच मदत होईल.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, या महोत्सवाच्या निमित्ताने युवकांसाठी एक दिशा निश्चित झाली आहे. उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे आपले जीवन अधिक सुकर होणार आहे. या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद याच्या आयोजनाचा उद्देश सफल करणारा आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा मोठ्या प्रमाणवर हा महोत्सव आयोजित करण्याचा मानस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
केपीआयटीचे चिन्मय पंडित म्हणाले, उद्योजक होण्यासाठी युवकांनी आपली आवड लक्षात घेणे आवश्यक आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमची आवड व जिद्द महत्वाची असून कठीण परिश्रमाला पर्याय नाही याची शिकवण युवकांना फेस्टिवल ऑफ फेस्टिवल या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाली आहे. जग झपाट्याने बदलत असून आज सर्वच क्षेत्रात करिअर करण्याच्या समान संधी उपलब्ध आहेत. फेस्टिवल ऑफ फेस्टिवल सारख्या अनोख्या उपक्रमाच्या आयोजनासाठी महानगरपालिकेचे मी अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमामध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, GoQII संस्थापक विशाल गोंडल, वणिरिक्स लॅब्सचे संस्थापक उदयन कानडे, अर्ली सॅलरीचे संस्थापक अक्षय मेहरोत्रा, बीव्हीज चे संस्थापक श्री दत्ता गायकवाड, तमिळनाडू सरकारचे सल्लागार डॉ. अभय जेरे, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे CIO डॉ. अभय जेरे, सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर, रेकॉर्डेन्टचे संस्थापक विन्नी पॅट्रो इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन पिंपरी चिंचवडकरांना लाभले. सुमारे दोन हजार लोकांनी या महोत्सवाला भेट दिली.
पिचफेस्टद्वारे पिंपरी चिंचवड तसेच देशभरातून विविध क्षेत्रातील स्टार्टअप व्यावसायिकांनी हजेरी लावत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडल्या. यावेळी अर्का व्हेंचर्स, गिल्ड कॅपिटल, १००x VC आणि आदित्य पिट्टी यांसारखे प्रमुख गुंतवणूकदार उपस्थित होते. तसेच हॅकाथॉनसाठी देशभरातून १२०० हून अधिक प्राप्त अर्जांमधून १६० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिकेच्या दैनंदिन समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवणा-या विविध स्टार्टअपसना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरवण्यात आले. तसेच पिचफेस्टमध्ये सहभागी बस्तर से बाजार तक, गो विद्युत मोबिलिटी, जीवट्रॉनिक्स Pvt Ltd. यांना गौरवण्यात आले. फेस्टिवल ऑफ फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी अधिकारी व कर्मचारी यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


















