न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- चिंचवडमधील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १८ मधील अखिल शिवतेज नगर, संभाजी नगर, शाहूनगर, पूर्णानगर या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ‘चार गाव एक शिवजयंती’ या संकल्पनेवर आधारित एकत्रितरित्या तिथीप्रमाणे शिवजयंती भव्यदिव्य स्वरूपात उत्साहात साजरी करण्यात आली.
सजविलेलेले चार अश्व, दोन उंट, महाराजांकरिता चांदीचा विद्युत रोषणाईचा रथ, आळंदी येथील २५ वारकरी मंडळ मुले, दोन ढोल पथके, मार्गावर रांगोळी पायघड्या, सनई चौघडा, सहा मंडळाचे ऐतिहासिक सजविले रथ, जनरेटर वाहन, शिवरांयांच्या, मावळ्यांच्या, हिरकणीच्या, जिजामातेच्या वेशभूषेत सुमारे ५० बाल बालिका, तसेच पारंपरिक वेशभूषेत सुमारे १०० महिला, एकूण ४०० भगवे फेटे धारी, मोठे १०० भगवे झेंडेधारी युवक असे एकूण १००० हजार शिवप्रेमी व नागरिकांच्या उपस्थितीत पाच बालकांच्या व पाच महिलांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व पाच तोफांची सलामी देऊन सायंकाळी ४.०० वा. भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.
संपूर्ण मिरवणूक मार्गावर कार्यकर्त्यांनी दुतर्फा भगवे ध्वज लावले होते. सूंदर रांगोळीच्या पायघड्या घालणारे पथक, स्थानिक नागरिक व संस्थातर्फे स्वयंस्फूर्तीने भव्य स्वागत व जलपान व्यवस्था, दुतर्फा मिरवणूक न्याहाळणारे नागरीक यांच्या उपस्थितीत वातावरण शिवमय व भगवे झाले होते. यावेळी ठिकठिकाणी भव्य आतषबाजी करण्यात आली.
पंडित दिनदयाळ उपाद्याय क्रीडा संकुल, श्री शनी मंदिर पूर्णानगर येथून प्रारंभ होऊन सुमारे ३ तास एकूण ४.५ किलोमीटरचा पूर्णानगर, शिवतेज नगर , संभाजीनगर मार्गक्रमण करीत राजांची भव्य मिरवणूक श्रीमहालक्ष्मी मंदिर, सदाशिव बहिरवाडे मैदान, शाहू नगर येथे समारोप स्थानी ईश्वर कृपेने निर्विघ्न पणे शिस्तीचा व समन्वयाचा उत्कृष्ट नमुना देत सुरळीत पोहचली होती. शिवव्याख्यान झाल्यावर शिववंदना होऊन शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य संकल्पनेतील हिंदू एकजुटीचे भव्य दर्शन घडवणाऱ्या संस्मरणीय मिरवणूकीचा समारोप झाला.
सार्वजनिक गणेश व नवरात्री उत्सव तरुण मंडळे, सर्व मंदिरे व धार्मिक संस्था, महिला बचत गट, सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ, सर्व राजकीय पक्ष यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्या वतीने शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीला सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासन, इतर शासकीय संस्थांचे, उपस्थित नागरिकांचे, सहभागी मंडळांचे आभार मानण्यात आले, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.