न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील एक कुटुंब मलेशियाला पर्यटनासाठी गेलं आहे. या कुटुंबानं परतल्यानंतर सोसायटीत दाखल होण्यास मज्जाव करावा यासाठी या सोसायटीतील सदस्यांनी पोलिसांत धाव घेतली होती.
मात्र, आता या सदस्यांनी यूटर्न घेत या कुटुंबाला सोसायटीत यायला बंधन नसलं तरी त्यांना जर करोनाची बाधा झालेली असेल आणि त्यामुळे सोसायटीतील सदस्यांना याची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सोसायटीच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे.
सोसायटीचे चेअरमन म्हणाले, “परदेशात गेलेल्या या कुटुंबाचं इथं घर आहे, त्यामुळे सोसायटीत येण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. मात्र, जे नागरिक परदेशातून सोसायटीत येणार आहेत त्यांच्यासाठी पोलिसांकडे काही गाईडलाईन्स आहेत का? याबाबत कोणाला कळवायच? ज्यामुळे प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवेल. यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आम्ही केवळ पोलिसांकडेच नाही तर विविध सरकारी लोकांकडेही गेलो होतो.” “मलेशियाला गेलेलं हे कुटुंब माझ्या घरासमोरचं राहतं त्यामुळे मला जास्त भीती वाटत आहे. ते परत आल्यानंतर काय करू हे मला कळत नाही. त्यामुळे मीच घर सोडून निघून जावं की काय असा विचार करतोय,” अशी भीतीयुक्त भावनाही या सदस्यानं व्यक्त केली आहे


















