न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०५ / ०३ / २०२० रोजी करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधी निर्देश दिलेले आहेत. तसेच यात्रा समारंभ, उत्सव इत्यादीसाठी मोठा जनसमुदाय एकत्रित असणा-या कार्यक्रमास प्रतिबंध करणे किंवा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यापासून परावृत्त करणे संबंधीचे आदेश दिलेले आहेत. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी मा. विभागीय आयुक्त, पुणे यांनी परिपत्रक क्रमांक नपा / ६ / कावि / १०० / २०२० दिनांक ०९ / ०३ / २०२० अन्वये कळविले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणु संसर्गाचा धोका निर्माण झाला असून सदर आजाराचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. करोना विषाणु उपाययोजना संबंधी दिलेल्या वरीलप्रमाणे निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालयामध्ये दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक तसंच अन्य सेवाभावी संस्थांचे समाजसेवक, ठेकेदार व ठेकेदारांचे कर्मचारी यांची मुख्य कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे दिनांक ३१ / ०३ / २०२० पर्यंत मनपा मुख्य कार्यालयात प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. ‘काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाचे आवश्यकतेनुसार नागरीकांना मुख्य कार्यालयात, आवश्यक असल्यास सुरक्षा विभागास निर्देश देणेत येत आहेत.
ज्या विभागाशी संबंधित कामकाज असेल त्या विभागाचे सबंधित विभागप्रमुखानी त्याची स्वाक्षरी परवानगी / पास अभ्यागताच्या नावासह दिल्यानंतरच विशेष बाब म्हणून प्रवेश द्यावा. प्रवेश द्यावयाचे नागरिकाने मास्क परिधान केलेला असावा. प्रवेश केल्यानंतर मुख्यालयातील स्वच्छतागृहामध्ये जाऊन सैनिटायझरचा वापर करावा. स्वच्छ हात धुऊन नंतरच कार्यालयातील संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडे जानेबाबत सुरक्षा कर्मचारी यांनी समक्ष सुचना द्याव्यात, तसेच कामकाज पूर्ण झालेनंतर लगेच कार्यालय सोडणेबाबत सूचना द्याव्यात. नागरीक अथवा इतर व्यक्ती जास्त वेळ विभागात रेंगाळणार नाही याची दक्षता बोलविणा-या संबंधित अधिका-याने घ्यावयाची आहे. मनपा गेट पासशिवाय कार्यालयामध्ये आढळणा-या अथवा विभागप्रमुखांनी लेखी परवानगी दिलेल्या नागरीकांशिवाय इतराना सुरक्षा विभागाने मनपा मुख्य कार्यालयात प्रवेश देवू नये, सुरक्षा विभागाने प्रत्येक मजल्यावर रखवालदार कर्मचारी नेमून त्यांचेमार्फत कार्यवाही करावी. मनपाचे अन्य क्षेत्रीय / विभागीय कार्यालयातील व मुख्य कार्यालयाबाहेरील सर्व विभागातील पाठवावयाचे अत्यंत तातडीचे टपाल हे फक्त संबंधित विभागाचे ई मेलद्वारे पाठविण्यात यावे. मुख्य कार्यालयाबाहेरील मनपा कर्मचा-यांनी अनावश्यक कामकाजाकरीता मुख्य कार्यालयात येवूनये. यावयाचे असल्यास विभागप्रमुखाचे पूर्व परवानगीने यावे. मनपा मुख्य कार्यालयामध्ये बैठक व्यवस्था असलेल्या अधिका-यांनी त्यांचे नियंत्रणाखाली असलेल्या उपविभागामधील अधिकारी / कर्मचा-यांना अनावश्यक कामकाजाकरीता मुख्य कार्यालयात बोलावण्यात येवू नये. या आदेशाची सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी तात्काळ काटेकोरपणे अंमलब जावणी करावी, असे महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी आदेशाच्या पत्रात म्हटले आहे.















