न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने पुणे असोसिएशनच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील हॉटेल व खाणावळी बंद निर्णयाबाबत चिंचवड येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीत करोनाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी खाद्यगृह बंद करण्याऐवजी संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, तसेच या काळात शासनाच्या अटीशर्थीचे पालन करत योग्य खबरदारी घेऊन हॉटेल बंद ठेवू नये, असा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तारांकित हॉटेल वगळता सर्व मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.
या आदेशाचे पालन करण्यात येईल. परंतु हॉटेल खाणावळी बंद केल्यास कष्टकरी कामगार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होईल या बाबींचा विचार करून एकमताने हॉटेल व खानावळी बंद करू नयेत, असे ठरविण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.













