न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- बोगस सॅनिटायझरच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ( एफडीए ) दापोडी येथील एका मेडीकलमधून संबंधित सॅनिटायझरचा नमुना घेतला. त्याची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.
बंधित मेडिकलमध्ये बोगस सॅनिटायझरची विक्री होत असल्याची तक्रार एफडीएच्या अन्न निरीक्षक भाग्यश्री कदम यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार तिथे जाऊन त्या सॅनिटायझरचा नमुना घेण्यात आला. संबंधित सॅनिटायझरवर परवाना क्रमांक आहे. त्यामुळे तो बोगस वाटत नाही. तथापि, आवश्यक तपासणीसाठी सॅनिटायझरचा नमुना घेतला आहे. त्याची तपासणी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी नमूद केले.
सध्या पुणे व पिंपरी – चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटयझर यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. पर्यायाने, मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे – नांदेड सिटी भागात एफडीएने कारवाई करून विनापरवाना उत्पादित केलेल्या ९९ हजार ७४३ रुपये किमतीचे सॅनिटायझर जप्त केले. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये बोगस सॅनिटायझरच्या तक्रारीवरून त्याबाबतचा नमुना घेण्यात आला आहे.













