न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्याविरोधात महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला कार्यालयात बोलवून शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिकारी महिलेच्या तक्रारीनुसार निगडी पोलिसांत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिंपरी महापालिकेच्या एका २५ वर्षीय महिला अभियंत्याने निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवक जावेद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कनिष्ठ अभियंत्यांना सोमवारी( दि . १६ ) सकाळी प्रभागातील कामाबाबत प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक जावेद शेख यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. तेथे प्रभागामध्ये चालू असलेल्या स्थापत्यविषयक विकासकामांबाबत विचारणा केली. तसेच, अरेरावीच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि श्रेय दुसऱ्या नगरसेवकाने घेऊन जायचे, मी साईडवर आल्याशिवाय एक वीट हलली, तर तुमच्याकडे बघून घेईल, अशी धमकी दिली. त्यामुळे नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध तक्रार असल्याचे महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे.













