न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- “पुण्यात किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी दुख:द घटना झाल्यानंतर अंत्यविधी, दहावा, मग तेराव्याला गर्दी केली जाते. माझं जनतेला आवाहन आहे की, गर्दी टाळा. लग्नसमारंभ असेल तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य नसेल तर जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडा. ग्रामीण भागात घरापुढे मंडप उभारुन लग्नं लावली जात आहेत. विधी कमीत कमी गर्दी करता कसे उरकता येतील याचा प्रयत्न करा,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.
पुण्यात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर पुण्यातील परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली आहेत. तर पुण्याचा आकडादेखील २१ वर पोहचलेला आहे. त्यामुळे कोरोनाच्याबाबत सरकार, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीयनि पालक करावे. कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करु नका. नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे. मुख्यमंत्री सातत्याने मुख्यालयात थांबून काम करत आहेत. खासगी व्यावसायिक घरात बसूनही काम करू शकतात. ते कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन काम करू शकतात. अजून त्याबाबत कोणताही निर्णय नाही. काही सोसायट्यांमध्ये परदेशातून आलेल्या लोकांना घेत नाहीत. तो बाधित नसेल तर त्यांना सोसायटीत येऊ द्यावे. लोकांनी शक्यतो घरात थांबावे. देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो. हे आपलं कर्तव्य आहे. पिपरी चिंचवड-पुण्यात सर्व व्यवहार बंद आहेत. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आहे. कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीने वागावे हातावर पोट असणाऱ्याना किमान वेतन द्यावे.
पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही”. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं भन्नाट उत्तर दिलं.















