- तर, दुकानांवर कारवाई करण्यात पोलीस मश्गुल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात १२ रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. शासनाकडून संचारबंदी करण्यात आली. मात्र, असे असतानाही आज मंगळवारीदेखील शहरवासीयांकडून किराणा दुकान व भाजी मंडईत गर्दी केली होती. शहरातील मुख्य चौकात संचारबंदी तर मंडईत गर्दी असे चित्र पिंपरी – चिंचवडमध्ये आहे.
कोरोनाग्रस्त १२ रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्यामुळे महापालिकेडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक म्हणून भाजीपाला, दूध विक्री व किराणा विक्री सुरूच राहील, असे शासनाकडून सातत्याने जाहीर करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. देशभर रविवारी जनता संचारबंदी पाळण्यात आली. त्याला पिंपरी – चिंचवडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे शासनाकडून संचारबंदी करण्यात आली.
किराणा व भाजीपाला घराजवळील दुकानातून खरेदी करणे अपेक्षित असताना नागरिकांनी भाजीमंडईत तसेच पिपरी येथील मुख्य बाजारपेठेतील किराणाच्या ठोक विक्रीच्या दुकानांमध्ये रांगा लावून गर्दी केली. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी झुगारले असल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहने तुरळक आहेत. मात्र, पिपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गर्दी झाल्याने येथील वाहनतळात मोठ्या संख्येने वाहने आली होती. नेहमीप्रमाणेच येथील पार्किग हाउसफुल्ल झाले होते. त्यामुळे भाजीमंडईबाहेर वाहनांचा खोळंबा झाला होता.
आजपावतो २५९ पेक्षा अधिक दुकानांवर कारवाई :-
एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.
पोलिसांकडून पिंपरी, भोसरी, वाकड, सांगवी, चिखली, देहूरोड परिसरात मागील पाच दिवसात केलेल्या कारवाईचा आकडा २५९ पेक्षा अधिक आहे. शहरातील दुकानांवर गुरुवारी १२९, शुक्रवारी ८०, शनिवारी २९, रविवारी ६, सोमवारी १५ आणि आज मंगळवारी देखील गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अनेक दुकानदार समोरचे गेट बंद करून मागच्या दाराने आपले व्यवहार सुरू ठेवतात. अशा दुकांदारांवर देखील कारवाई केली जात आहे.















