न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या भीतीने त्रस्त आहे. प्रत्येक देश या विषाणूशी लढत आहे. त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, २१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला व परराज्यातून आलेल्या लोकांना ‘आहे तिथेच रहा’ आहे असे सांगितले आहे. मात्र, कामच नसल्यामुळे व जवळचे पैसे संपल्यामुळे गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सामाजिक भान जपत आमदार महेश लांडगे समर्थक ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य तथा जनसेवक पांडुरंग भालेकर यांनी ‘ एक हात मदतीचा ‘ हा उपक्रम राबवत, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील गरजू लोकांना मदत केली. सध्या २१ कुटुंबांना म्हणजे प्रत्येक कुटुंबातील जवळपास पन्नास लोकांना त्यांनी पंधरा दिवस पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा स्वखर्चाने उपलब्ध करून दिला आहे.
त्यांनी आटा, तांदूळ, साखर, डाळ, मीठ, चहा-पावडर, कपड्याचे व अंगाचे साबण, तेल यांचे किट करून गरजूंना वाटप केले. तसेच प्रभाग १२ मधील तळवडे, रुपीनगरमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. गरजू व ज्यांचे हातावर पोट असेल अशांनी ९८२२१८९२२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. अशांना जमेल तेवढी मदत केली जाईल. तसेच समाजातील ज्या दानशूर व्यक्तींना वस्तुरुपी मदत करायची असेल, त्यांनीही संपर्क साधावा. त्यांची मदत नक्कीच समाजातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहोचली जाईल, अशी माहिती भालेकर यांनी दिली.













