- गेल्या काही दिवसांपासून बंदोबस्तावरील पोलिसांना दिले अन्नाची पाकिटं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम पिंपरी चिंचवड शहर पोलीस अहोरात्र रस्त्यावर उतरून करीत आहे. मात्र, बंदोबस्ताला असणाऱ्या या पोलिसांना मूलभूत आहारास वंचित रहावे लागत आहे.
याबाबतीत भाजपा नगरसेवक शैलेश मोरे, इनरव्हील क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष अनुजा जामगांवकर, पीपी राजिंदरकौर सोखी, पीपी जसविंदरसिंग सोखी, आरसी आकुर्डीचे गणेश जामगावकर, हिल्टन डबल ट्री हॉटेलचे जनरल मॅनेजर आदित्य मल्ला या स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. हे सर्व स्वयंसेवक चिंचवड डीसीपी झोनच्या अखत्यारीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवाना प्रशासनाचे कायदेशीर नियम पाळून जेवणाचे पाकीट (फूड पॅकेट) पुरवत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या जेवणाचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.
नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूमुळे बाधितांच्या संख्येने दोनशेहून अधिकची संख्या पार केली आहे. या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. स्वतंत्र भारतामध्ये अशी अभूतपूर्व आणीबाणी पहिल्यांदाच देशाची करोडो जनता अनुभवत आहे. लोकानी रस्त्यावर येऊ नये. कोरोना या विषाणूचा संसर्ग आटोक्यात रहावा यासाठी शहर पोलीस अहोरात्र बंदोबस्ताला आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणाची अबाळ होऊ नये, यासाठी आमच्या स्वयंसेवक मित्रांच्या मदतीने चिंचवड परिसरात गस्तीला असणाऱ्या पोलिसांना हायजेनिक अन्नाचे पाकीट वाटण्याचा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या पोलीस बांधवाची काही अंशी का होईना जेवणाची भ्रांत मिटली आहे. तसेच पोलिसांकडूनही या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक होत आहे.













