- पिंपरी चिंचवड शहरात उरले केवळ तीनच कोरोनाबाधित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसांत करोना आजारापासून मुक्त झालेल्या एकूण ९ व्यक्तींना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात आता केवळ तीनच करोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीमधील नूतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आजवर शहरात १२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
डॉक्टरांनी परिश्रम घेतल्याचे स्पष्ट दिसत असून गेल्या तीन दिवसांमध्ये ऐकून ९ जणांना ठणठणीत बरं केलं आहे. या १२ रुग्णांपैकी रविवारी सकाळी पाच जणांना तर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला. रात्री डिस्चार्ज दिलेली व्यक्ती ही जपानच्या टोकियो शहरातून आली होती. करोनाची बाधा असल्याचं निष्पन्न झाल्यांतर भोसरी येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
सुरुवातीला हीच आकडेवारी भीतीदायक होती. लॉकडाऊननंतर शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही.


















