न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- शाहूनगरमध्ये सोमवारी रात्री अकरा वाजता अचानकपणे आंब्याचे झाड पार्क केलेल्या वॅगनार या चारचाकी वाहनावर कोसळले. यात कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. येथील रहिवासी अप्पा कुलकर्णी यांच्या दारासमोर हे आंब्याचे झाड होते.
स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांना मदत कार्यासाठी पाचारण केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनावरील आंब्याचे झाड बाजूला केले. तसेच नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला. आंब्याचे झाड खूप चांगल्या व सुस्थितीत होते. परंतु तरीदेखील ते कोसळले, असे त्यांनी सांगितले.
परिसरात पडझड होण्याची शक्यता असलेली झाडे असतील तर कृपया कळवावीत. जेणेकरून चारचाकी वाहनांचे नुकसान किंवा जीवितहानी टाळली जाऊ शकेल, असे आवाहन नगरसेविका गोरखे यांनी नागरिकांना केले आहे.


















