न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- अवैध मद्यसाठा करणाऱ्यास पोलिसांनी छापा मारून अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. ३०) संभाजीनगर, भोसरी – आळंदी रोड येथे ही कारवाई केली.
बिपलब रामनाथ बर्मन (३३, रा. नुर कॉलनी, दिघी रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकातील कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना आळंदी रोडवरील संभाजीनगर येथील राज पान स्टॉलमध्ये अवैध मद्यसाठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा मारून बर्मन यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी टपरीची झडती घेतली असता त्यांना २२ हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.


















