न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२०) :- सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या परिस्थितीचा काही जणांकडून फायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. “ग्राहकांच्या अशा परिस्थितीचा फायदा घेणारी लोकं म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारेच म्हणावे लागतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
“काही लोक अशा परिस्थितीतही स्वत:चा नफा कमवण्याचा प्रयत्न करतायत. अशा लोकांवर मोका लावला पाहिजे अशा मताचा मी आहे. परंतु काही गोष्टी नियमात बसून कराव्या लागतात. त्यांची गय केली जाणार नाही.
त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जात आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं. “लोकांना सध्या परिस्थितीचं गांभीर्य कळू लागलं आहे आणि आपण असं काही करू नये अशी त्यांची मानसिकताही तयार होऊ लागली आहे,” असंही ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


















