न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या मुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. या बिकट परिस्थितीत कोणतीही व्यक्ती भुकेली राहू नये यासाठी शहरातील जैन समाजाच्या वतीने सकस व शुद्ध आहार गरजूंना देण्याची यंत्रणा उभी केली आहे. शहरातील एक हजार भुकेल्या व्यक्तींना या कार्यातून पोटभर भोजन देण्याचे कार्य सध्या सुरू आहे.
अचानक ओढवलेल्या संकटामुळे शहरातील अनेकांची अडचण झाली आहे. उद्योगनगरीत राज्याच्या विविध काना-कोपऱ्यातील कामगार, विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या कठीण प्रसंगी कोणीही उपाशी राहू नये यासाठी सकल जैन मूर्ति पूजक समाज पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण वर्धमान जैन श्रावक संघ व पिंपरी-चिंचवड विहार सेवा यांच्या वतीने सकस आहारव्यवस्था महावीर चीरोटी प्रकल्पाचे प्रणेते जेष्ठ समाजसेवक संतोष लुंकड यांच्या प्रेरणेने करण्यात आली आहे.
या माध्यमातून शहरातील विविध भागात गरजूंना दोन वेळचे भोजन देण्यात येत आहे. यासाठी कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेची काळजी घेऊन हे कार्यकर्ते मदतीचा हात देत आहेत. भोजन व्यवस्थेसह केळी व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील संपूर्ण जैन समाज तसेच उद्योजक संतोष कर्नावट, जयकुमार चोरडिया यांनी या कार्यासाठी विशेष योगदान दिले आहे. भोजन व्यवस्था पोहचविण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था विहार सेवा ग्रुपच्या सदस्यांकडुन स्वयंस्फुर्तीने करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याने ज्या भागात गरजूंना भोजन हवे आहे त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पी.सी.एम.सी. विहार सेवा अध्यक्ष भद्रेश शहा यांनी केले आहे. आकुर्डीतील जैन स्थानकात भोजन बनविले जात असून स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी घेऊन वाटप केले जात आहे. या कार्यामुळे अनेक गरजूंना आधार मिळत असल्याने अनेकांनी जैन समाजाचे आभार मानले आहेत.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




