- शहरातील अन्य उपनगरांनी देखील या घटनेतून घ्यावा आदर्श…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्शभूमीवर सर्व ग्रामस्थांनी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पोलिसांकडून कार्यवाही व्हावी याकरीता सर्व ग्रामस्थ व नगरसेवक यांनी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना च्या दहशतीमुळे समस्त चिखलीगाव आणि आजूबाजूचा परिसर शुक्रवारी (दि. १० ते १२ एप्रिल) रविवार दरम्यान तीन दिवस बंद राहणार आहे, असा ठराव चिखली ग्रामस्थांनी केलेला आहे. या बंद दरम्यान परिसरातील केवळ रुग्णालये आणि मेडिकल शॉप उघडे राहतील. अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
कुदळवाडी, पवार वस्ती, घरकुल, आळंदी रोड आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे बंद असणार आहे. आजूबाजूच्या रस्त्यावर बिनकामी लोकं आढळल्यास पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या बंदची सर्व परिसरात रिक्क्षाद्वारे जनजागृती होणार आहे. या कामी परिसरातील सर्व नागरिक सहकार्य करणार आहेत. त्यामुळे या काळात बंदोबस्तावरील पोलिसांचे सहकार्यही अपेक्षित आहे. तरी, या तीन दिवसीय बंदला पोलीस विभागाची तत्काळ मंजुरी मिळावी, असे या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे.
या निवेदनावर माजी महापौर राहुल जाधव, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, नगरसेवक संजय नेवाळे, कुदंन गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, फ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, संगीता ताम्हाणे यांच्या सह्या आहेत.













