- माजी उपमहापौर व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची एकत्रितरित्या मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- माजी उपमहापौर, नगरसेवक सचिन चिंचवडे व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांची मिळकत कर माफीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक नुकतीच चिंचवडेनगर येथे पार पडली. सामाजिक क्षेत्रातील समितीचे शहर पदाधिकारी व रहिवाशी संघटनेचे पदाधिकारी तसेच कामगार नगरीतील नागरिक यांच्या संयुक्त माध्यमातून संपूर्ण मिळकत माफीसाठी लवकरच आयुक्तांची व महापौरांची भेट घेतली जाणार आहे.
सचिन चिंचवडे म्हणाले, “कोविड १९ म्हणजेच कोरोना महामारीमुळे शहराचे आर्थिक गणित पूर्णपणे गडगडले आहे. रहिवाशी नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झालेले आहे. अश्या कठीण काळात महापालिकेने प्रॉपर्टी टॅक्स नागरिकांकडून न घेणेच नियमनाकुल ठरते. मूलभूत गरजाच जर पूर्ण होत नसतील तर टॅक्सची रक्कम कशी भरायची? हा महत्वपूर्ण प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्याकरीता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती त्याचप्रमाणे ह्या लढ्यात सामील होणारे सहकारी नगरसदस्य व रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहोत. तसेच येत्या सर्वसाधारण सभेमध्ये ह्या महत्वपूर्ण विषयाबाबत लेखी पत्र माननीय सभाअध्यक्ष यांना देणार आहे. ह्या महत्वपुर्ण सुचनेची ते सुद्धा नक्कीच दखल घेतील यात शंका नाही.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “सद्यस्थितीत शहराची आरोग्य स्थिती कोरोनामुळे चिंताजनक बनलेली आहे. शहराची कोरोना बाधितांची संख्या वेगाने पन्नास हजाराकडे सरकत आहे. अश्या बिकट काळात पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य रहिवाशी नागरिकांचे विशेषतः मध्यमवर्गीय कामगार कुटुंबियांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे. त्यातच पाणीपट्टी, विजबिले, शालेय फी, दैनंदिन खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय माणूस कराचा आर्थिक बोजा आता सहन करू शकत नाही, याकरिता एक वर्षाचा मिळकत कर पूर्णपणे माफ करण्यात यावा व शहरवासीयांना दिलासा द्यावा. नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी याबाबत मांडलेली भूमिका नक्कीच लोकहितवादी व स्वागतार्ह आहे. देशाच्या १०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशी अपवादात्मक गंभीर परस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांची ही मागणी महापालिका प्रशासनाला मान्य करावीच लागेल अन्यथा जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”
कोरोनामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट घोंघावत आहे. बेरोजगारी वाढली आहे. अनेक नागरिक गावाकडे गेली आहेत. उत्पन्न जाग्यावर ठप्प आहे. त्यामुळे पालिकेने यंदाचा मिळकतकर माफ करावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर चिंचवडे करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने तरी या विषयी नरमाईची भूमिका घ्यावी.