- नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून पर्यायी व्यवस्था करा..
- शिवसेना (उबाठा) पिंपरी- चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ ऑगस्ट २०२६) :- कासारवाडी येथील रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात पुण्याचे डी.आर.एम. नागेंद्र कुमार यांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडच्या कासारवाडी येथील रेल्वे गेट परिसरातून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवा ये-जा करतात. त्यामुळे हा मार्ग नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रेल्वे गेट बंद केल्यास नागरिकांना मोठा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार असून, त्यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक खर्चात वाढ होणार आहे. रेल्वे गेट बंद झाल्यास परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम आपत्कालीन सेवांवरही होऊ शकतो. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने तसेच अन्य अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या सोयीचा आणि सुरक्षिततेचा विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे कासारवाडी रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा किंवा नागरिकांसाठी सक्षम पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी,” अशी मागणी चेतन पवार यांनी केली आहे. नागरिकांच्या हिताचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कासारवाडी परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.
निवेदन देताना शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवार यांच्यासह उपजिल्हा प्रमुख रोमी संधु, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, पिंपरी-चिंचवड शहर संंघटक कैलास नेवासकर, शिवसेना नेते दिलीप सावंत, अशोक खांडेभराड आदी उपस्थित होते.

















