- मागण्यांवर सकारात्मक चर्चा; धोरणात्मक प्रश्न शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६) :- महाराष्ट्र रिक्षा पंचायत तसेच विविध रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांच्या वतीने पिंपरी व पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरोधात पुकारण्यात आलेले आंदोलन चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. ‘टू व्हीलर टॅक्सी’ला विरोध, ‘पिंक रिक्षा’ योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी तसेच रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनाची दखल घेत आरटीओ प्रशासनाने शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या उपस्थितीत दोन तासांहून अधिक काळ बैठक झाली. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
आरटीओ स्तरावरील प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. टू व्हीलर टॅक्सी, पिंक रिक्षा टेंडर आणि अॅग्रीगेटर पॉलिसीसारखे धोरणात्मक प्रश्न शासनाकडे पाठविण्याचे ठरले.
बैठकीनंतर १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ ऑगस्टनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीने दिला.


















