- अभिषेक बारणे यांचा काळेवाडी-थेरगाव भागाचा पाहणी दौरा…
- नागरिक, वाहनचालक व फेरीवाल्यांच्या हिताचा समतोल साधणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी पार्किंग पॉलिसी तसेच हॉकर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीचा आराखडा समजून घेण्यासाठी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि ग क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली.
महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील काळेवाडी फाटा चौक, बीआरटी मार्ग तसेच थेरगाव परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित भागातील वाहतूक कोंडी, उपलब्ध पार्किंगची जागा, पादचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली सुरक्षित जागा आणि फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी योग्य ठिकाणे यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे आणि फेरीवाल्यांनाही त्यांच्या व्यवसायासाठी नियोजित जागा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व घटकांचा समतोल साधला जाणार आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याचा विचार करून हॉकर झोन तसेच पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रस्ते हेच सुदृढ शहराचे प्रतीक आहेत. पार्किंग आणि हॉकर धोरणाची अंमलबजावणी करताना नागरिक, वाहनचालक, पादचारी आणि फेरीवाले या सर्वांच्या हिताचा विचार केला जाईल, अशी भूमिका सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केली.
यावेळी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावताना नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


















