न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- मांजाने गळा खोलवर कापल्याने एक दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. दापोडी येथील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) मुख्य प्रवेशव्दारासमोरील पुणे – मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
आनंद देशपांडे (रा. रावेत), असे जखमी दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. देशपांडे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गुरुवारी सायंकाळी ते त्यांच्या दुचाकीवरून पुणे येथून रावेत येथे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी पुणे – मुंबई महामार्गावर दापोडी येथे सीएमईच्या गेटसमोरील उड्डाणपुलावर मांजाने त्यांचा गळा कापला. त्यामुळे त्यांनी लागलीच दुचाकी थांबविली.
दरम्यान त्यांच्या पाठीमागे असलेल्या काही वाहनचालकांनी त्यांची वाहने थांबवून देशपांडे यांच्या मदतीला धावून आले. मांजाने गळा कापल्याचे लक्षात येताच मांजा तोडून हटविण्यात आला. तसेच देशपांडे यांना कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, याबाबत नागरिकानी पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.














