- ‘जमिनीचा व्यवहार मिटवून टाक’, फिर्यादीला मोबाईलवरुन भरला दम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन जमिनीचा व्यवहार मिटवून टाक, असा फिर्यादीला मोबाईलवरुन दम भरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रीतेश शिंदे (वय २५, रा. खडकी, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली आहे. प्रशांत सोळसकर (रा. खडकी, ता. दौंड) याने फिर्याद दिली आहे.
एका कुटुंबात दुकानाच्या जागेवरुन वाद सुरु आहे. एका गटाची बाजू घेत प्रितेश शिंदे याने अजित पवार यांच्या आवाजात प्रशांत सोळसकर यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधत अजित पवारांच्या आवाजात म्हणाला, खडकी गावात जमिनीवरुन वाद घालू नका, आपसात मिटवून टाक. मी दोन दिवासांनी खडकी परिसरात येणार आहे, तेव्हा तुझी गाठ घेतो. मात्र प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न करु नको. जमिनीवरुन एकाच कुटुंबात वाद कशाला घालता? माझा तुला मोबाईल आला म्हणून सांगू नको मी तुझी एकांतात गाठ घेतो, अशा प्रकारचा दम दिला. या परिसरात मला आय. टी. पार्क यासह अन्य काही विकासकामे करायची आहेत, असे सांगीतले.
प्रशांत सोळसकर यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांना संपर्क साधून आलेला मोबाईल नंबर दिला. या मोबाईलवरुन पोलीसांनी प्रीतेश शिदेला तातडीने अटक केली त्याच्यावर गुन्हा दाखल केला.














