न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- वीज ग्राहकांना पाठविलेल्या विसंगत व सदोष बिलाबद्दल निषेध करून महावितरणच्या भोसरीतील, बालाजीनगर जवळील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. वीज बिलांची होळी करीत या वेळी आंदोलकांनी महावितरणचा निषेधही केला. आंदोलनकर्त्यांनी मागणीचे निवेदन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विकास आल्हाट यांना दिले.
राज्य सरकारच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आल्हाट यांनी सांगितले. पिंपरी – चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा मोर्चा काढला होता. मार्च ते सप्टेंबरपर्यंतची महावितरणने राज्यातील घरगुती, सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योजक यांना देण्यात आलेली वीज बिले पूर्णत : माफ करावीत, दोनशे युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबरोबरच वीजदरामध्ये कपात करण्याच्या मागण्या या वेळी मांडण्यात आल्या.
वंचित आघाडीचे पिंपरी महावितरणने राज्यातील सर्वांचे वीज बिल सरसकट माफ केले पाहिजे. त्याचप्रमाणे दर महिना दोनशे युनिट वीज मोफतही दिली पाहिजे. वाढविलेले वीजदरही कमी केले पाहिजेत. महावितरणने मागण्या मान्य न केल्यास अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. वंचित आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रवक्ते के डी वाघमारे, महासचिव रहिमभाई सय्यद, शांताराम खुडे, सनी गायकवाड, शारदा बनसोडे, बबन सरोदे, राजन नायर, राजेश यारसागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.















