- जागतिक दृष्टिहीन दिनानिमित्त ‘ चलो किसीका सहारा बने ‘ अंधांसाठी विशेष कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- जागतिक दृष्टिहीन दिनानिमित्त समाजातील वंचित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी ‘ चलो किसीका सहारा बने ‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आले होते. दृष्टिहीन बांधवांच्या व्यथा, वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नको सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले.
अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार घेण्यासाठी समाजातील व्यक्तींनी पुढे यायला हवे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष पराग कुंकूलोळ, जितो अध्यक्ष संतोष धोका यांच्यासह संस्थेचे सहकारी व दृष्टिहीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या अनोख्या शैलीत अंध बंधवांना शुभेच्छा दिल्या.
आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवं, मोठी स्वप्नं पाहून आपल्या अंतर मनाला जागृत करून विविध क्षेत्रातील संधीचं सोनं करून घ्यावं, अडचणींवर मात करून आपण शिक्षण, खेळ, नोकरीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहात, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी संगितले.
कार्यक्रमासाठी दृष्टिहीन विद्यार्थी, संतोष राऊत, तृप्ती कर्णावट, पूनम बंब, सुस्मिता कन्हेरी, नेमीचंद ठोले, विश्वास काशीद, अर्चना चोरडिया, सचिन साकोरे, उमेश भंडारी, मनीष ओस्तवाल यांच्यासह संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले. प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व जितो पिपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयुक्तांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन केले. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी हा कार्यक्रम झाला.
डोळ्यात दाटलेले काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या दृष्टिहीन बांधवाना मार्ग दाखविणाऱ्या पांढ-या फीतीचे वाटप आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यक्ती आपले अस्तित्व कशा प्रकारे दाखवीत आहेत. याबाबत ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दृष्टिहीन शिक्षक व प्रशिक्षक सतीश नवले यांनी ऑनलाइनद्वारे आयुक्तांशी संपर्क साधत दृष्टिहीनांच्या शिक्षण, रोजगार व इतर कार्यक्रमांची माहिती दिली.