न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्रावर आजपर्यंत प्राधिकरणाकडून खर्च केल्यानंतर पुन्हा केंद्राच्या व्यापारी भूखंड क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी १३६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आली. तसेच, ते खासगी संस्थेला सोपविण्याबाबत चर्चा झाली.
विभागीय आयुक्त आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, महापालिकेचे अभियंता राजन पाटील उपस्थित होते. काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर खुले प्रदर्शन केंद्र व लगतच्या दहा हेक्टर क्षेत्राचे व्यवस्थापन केले जाणार आहे. हे केंद्र खासगी संस्थेला सोपविण्यात येणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या टप्प्यातील कामात एकूण ३ प्रदर्शन हॉल उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक हॉल ३५ हजार चौरस मीटरचा असणार आहे. त्यासाठी वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी निविदा प्रारुपास मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत २० हजार चौरस मीटर क्षेत्राचेच बांधकाम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पेठ क्रमांक सहा येथील गृहप्रकल्पाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.