- महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) :- विजेच्या लंपडावामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या अभियंत्यासोबत चिखली – मोशी – चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची बैठक मोशी येथे पार पडली. या बैठकीत महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या त्रासाचा या बैठकीत ग्राहकांनी पाढाच वाचून दाखविला.
आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोशीतील स्वराज्य हौसिंग सोसायटीत ही बैठक पार पडली. गेली अनेक दिवसांपासून चिखली, मोशी, च-होली, डुडुळगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ‘ वर्क फ्रॉम होम ‘ करणारे सॉफ्टवेअर अभियंते, तसेच दहावी, बारावीच्या विद्याथ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या जनरेटरकरिता लागणाऱ्या डिझेलचा लाखो रुपये खर्च कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला.
जर महावितरणकडून हे प्रकार थांबले नाहीत तर आंदोलनाचा इशारा फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिला. खंडित वीजपुरवठ्यामुळे महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा सोसायट्यांच्यामधील महिलांचा ‘ उद्रेक होऊ शकतो, अशी भावना नीलम हुले यांनी व्यक्त केली.
यावर महावितरणचे मोशी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता विक्रांत वरुडे यांनी महावितरणची बाजू मांडली. या बैठकीला फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे, स्वराज सोसायटीचे चेअरमन मस्के, कोअर कमिटी सदस्य उडाने, नीलम हुले, फेडरेशनचे ऋषभ खरात, बलाप्पा माने आदी उपस्थित होते.