- उपमहापौरपदासाठी नगरसेवक केशव घोळवे यांनाच संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- उपमहापौरपद भोसरी की पिंपरीला द्यायचे याबाबत रविवारी दिवसभर भाजपमध्ये खलबते सुरू होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी केशव घोळवे यांचे नाव कळविले. त्यानुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी नगरसेवक केशव घोळवे यांनाच संधी देण्यात यावी, असा आदेश शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना दिला आहे.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून पक्षीय बलाबल अधिक असल्याने उपमहापौर हा भाजपचा होणार आहे. स्थायी समिती, महापौर, विविध समित्यांचे सभापती अशी प्रमुखपदे चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात दिली गेली आहेत. त्यामुळे उपमहापौरपद पिंपरीत मिळावं, अशी मागणी भाजपच्या जुन्या गटानी केली होती. तर मुंडे गटाने केशव घोळवे यांचे नाव सुचवले होते. आमदार लांडगे गटाने वसंत बोराटे यांचे नाव पुढे केले होते.
तर दुसरीकडे घोळवे यांना उपमहापौरपद मिळू नये, यासाठी भाजपतील जुन्या निष्ठावान गटातील काहीजण प्रयत्नशील होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घोळवे यांना संधी देऊ नये, अशी मागणी केली होती. घोळवे यांना संधी मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व आ. लक्ष्मण जगताप यांना हा धक्का असल्याचे मानले जाते.
















