- शहराच्या सर्वांगीण विकासाला गती; विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना हिरवा कंदील..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसह अनेक प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला.
बैठकीत पुणे मेट्रो फेज-१ विस्तारांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी महापालिकेच्या आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली. तसेच दिघी, बोपखेल, दापोडी परिसरातील मलनिस्सारण व्यवस्थेच्या उन्नतीकरणासह मामुर्डी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.
पुनावळे येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली असून शहरातील विविध प्रकल्पांमधील अग्निशामक यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीची कामेही मंजूर करण्यात आली. याशिवाय वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या मान्यताप्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क आणि सोनोग्राफी यंत्रणेच्या देखभालीस मंजुरी देण्यात आली.
महापालिका शाळांची दुरुस्ती, कोयनानगर व सीडीसी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, मुख्य प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती, सभागृह नूतनीकरण, पावसाळी वाहिन्यांची साफसफाई तसेच डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांनाही मान्यता देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी गॅस डिटेक्टर खरेदीलाही मंजुरी देण्यात आली.
“नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विकासकामांना प्राधान्य देत शहराला अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,” असे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.















