MMIDR धर्तीवर विशेष पुनर्विकास धोरणाचा विचार; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसीच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा चर्चेत आला. भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय सभागृहात मांडत हजारो कामगार कुटुंबांच्या अडचणींवर प्रकाश टाकला.
आमदार गोरखे यांनी सांगितले की, ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती आज अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि निवृत्त कामगारांना सहाव्या-सातव्या मजल्यापर्यंत पायी चढ-उतार करावा लागत आहे. तसेच या भागात यूडीसीपीआर लागू नसल्याने पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मागील अधिवेशनात विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मिळूनही अद्याप बैठक न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तातडीने स्वतंत्र पुनर्विकास धोरण लागू करण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत MMIDR धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी इमारतींसाठी विशेष पुनर्विकास धोरण राबविण्याबाबत सरकार आणि एमआयडीसी सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन दिले.
कष्टकरी कामगारांना सुरक्षित व आधुनिक सुविधा असलेली घरे मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी यावेळी मांडली.















