न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जून २०२६) :- जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याचे ७ जुलै २०२६ आणि श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजक, विश्वस्त आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढावा बैठका पार पडल्या.
बैठकीत पालखी मार्ग, मंदिर परिसर, वाहतूक व्यवस्था, पर्यायी मार्ग, दिंडींच्या वाहनांचे नियोजन, वारकऱ्यांना मार्गदर्शन, गर्दी नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विश्वस्तांनी मांडलेल्या सूचना आणि अडचणींची नोंद घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पूर्वतयारीचे निर्देश देण्यात आले. यावेळी दोन्ही पालखी सोहळ्यांच्या विश्वस्तांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विविध विभागांचे पोलीस उपआयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















