- नागरिकांनी ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट असून, पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी शहरात एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये १००८ स्थायी केंद्रे, ३५ ट्रान्झिट केंद्रे आणि ७७ फिरती केंद्रे कार्यरत राहणार आहेत. बस, रेल्वे आणि मेट्रो स्थानकांसह वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित वस्त्यांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय तीन नाईट टीमदेखील कार्यरत असतील.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ कर्मचारी यांच्यासह सुमारे ५ हजार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बूथवर लसीकरण होणार असून, दि. २९ जून ते ३ जुलैदरम्यान घरभेटीद्वारे राहिलेल्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.
पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.















