न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पक्षीय बलाबलाचे कारण देत प्रभाग समिती, विषय समिती सभापतिपदांची निवडणूक न लढविणाऱ्या राष्ट्रवादीने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आज शुक्रवारी निवडणूक होणार असून विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मुंडे गटाशिवाय इतर गट कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी – चिंचवड शहराच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चमत्काराविषयी त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरीगावातील निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीची खेळी कितपत यशस्वी होणार
उपमहापौर निवडीसाठी भोसरीतील आमदार महेश लांडगे गटाकडून वसंत बोराटे यांचे नाव सुचविले होते. तर चिंचवडचे आमदा लक्ष्मण जगताप यांच्या गटातील काही जणांनी घोळवे यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष घातल्याने आमदारांच्या अधिकारांवर गदा आली होती. त्यामुळे आजच्या निवडणूकीत भाजपातील मुंडे गट वगळता अन्य गटांचे नगरसेवक काय निर्णय घेताहेत, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. मतदान हे गुप्त नसून सदस्यांनी हात वर करुन मतदान करायचे आहे. त्यामुळे चमत्काराविषयी सांशकता आहे.