न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२०) :- राज्य शासनाकडून मंजूर झालेली पिंपरी ‘आरटीओ’साठी ४ हेक्टर जागेची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याबाबत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरटीओ कार्यालायस जागा मिळणार आहे. तेथे ब्रेक टेस्ट ट्रकसह नवीन वाहन नोंदणी व तपासणी केंद्र स्थापन करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हस्तांतर प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दिवाळीत ती जागा ताब्यात मिळेल.
चिखली येथील पेठ क्रमांक ३२ येथील गट क्रमांक ५३९ मध्ये ४ हेक्टर जागा मंजूर झाली आहे. पिंपरी चिंचवड अंतर्गत ब्रेक टेस्ट ट्रक आणि वाहन तपासणीसाठी परिहवन विभागाकडे ती सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याबाबत अंतिम कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ती तहसील कार्यालामार्फत आरटीओच्या ताब्यात देण्यात येईल. जागेचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांत मंजूर प्रयोजनासाठी तिचा वापर बंधनकारक राहणार आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी त्या जमिनीचा अथवा तात्पुरता भागाचा वापर करता येणार नाही. या जागेतून भूमिगत गॅसलाईन असल्याने तेथे कोणत्याही प्रकाराचा विकास करता येणार नसून, सुरक्षित अंतर सोडणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणत्याही सूचना अथवा अहवाल प्राप्त झाला नाही. आरटीओच्या माध्यमातून तेथे कोणत्या प्रकाराचे काम करायचे आहे याचा आखाडा प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रीया सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक विभागाच्या अधिकारी दीपाली पोतदार यांनी दिली.