- अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लीटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसें.) :- विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लीटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आयोजित केलेल्या ‘एक दिवस उद्यानात’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी धमाल केली. तसेच निसर्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधीही दवडली नाही.
शाळेच्यावतीने दरवर्षी एकदिवसीय सहलीचे आयोजन केले जाते. यंदा जुनी सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची सहल नेत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. एवढेच नाही तर शिक्षकांकडून गोष्टी ऐकूण घेण्याची संधीही विद्यार्थ्यांनी सोडली नाही. विद्यार्थ्यांनीही मुखोद्गत असलेल्या गोष्टी सर्वांना ऐकविल्या. विद्यार्थ्यांनी योगा केला, गाणी गायली.
मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांसाठी कृतियुक्त शब्दांचा खेळ घेतला. विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत धमाल केली. शिक्षिका राजश्री आणि अंजुम पिरजादे यांनी विविध गाणी गात विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थी शुभम घोरपडे आणि कुणाल साळवी यांनी कार्टूनची वेषभूषा करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत आणि मनोरंजन केले. निसर्गाच्या अगदी जवळ जात निसर्गाची विविध रूपे विद्यार्थ्यांनी अनुभवली. आपण राहत असलेल्या जवळच्या परिसराची मिळालेली माहिती आपल्या स्मरणात ठेवून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकप्रकारे मैत्री केली असल्याचेच यावेळी जाणवत होते.
शाळेच्या शिक्षिका, तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत सहकार्य केले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, राजश्री येन्गुन्दूल, अंजुम पिरजादे आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.