केंद्राकडून पिंपरी – चिंचवड शहरात ललित केंद्र विकसित करण्यास मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला ललित कला अकॅडमी केंद्र मंजूर झाले आहे. राज्यात हे केंद्र व्हावे यासाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करणाऱ्या कलावंतांच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यातील पिंपरी – चिंचवडमध्ये हे केंद्र विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता पिंपरी – चिंचवड महापालिकेने बालविकास केंद्राची जागा देण्याची आपणहून तयारी दर्शवली आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकॅडमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता. राज्यातदेखील एक केंद्र असावे, या मागणीसाठी चित्रकार, शिल्पकार यांनी दिल्ली येथे तब्बल ४० वर्षे आंदोलन, उपोषण, मोर्चे या माध्यमातून संघर्ष केला. अखेर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पिंपरी – चिंचवड येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती ललित कला अकॅडमी दिल्लीचे अध्यक्ष उत्तम पाचरणे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘ कला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मात्र तरीही कलेकडे उपेक्षित दृष्टिकोनातून पाहिले जाते. कलेसंदर्भातील शिष्यवृत्तीसाठी कलाकारांना मद्रास किंवा दिल्लीचा मार्ग धरावा लागतो. त्यामुळे कलाकारांचे शिक्षण थांबते. याकरिता महाराष्ट्रात ललित कला अकादमीचे केंद्र व्हावे, अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अनेक सरकारे आली, मात्र केवळ आश्वासनेच मिळाली. जागा मिळायची ; नंतर ती काढून घेतली जायची. पण मोदी यांनी आमच्या मागणीची दखल घेतली आणि केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पिंपरी – चिंचवड येथे केंद्रास मंजुरी दिली आहे.