- मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून सोमवार (दि. २३) रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त सुधीर जोशी आदी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, अभिजित चौधरी, शेखर सिंग हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
पदवीधरव शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्वानी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मतदानासाठी कर्मचा-यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण लवकरात लवकर द्या. निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा. निवडणुकीचे काम सांघिक भावनेने एकमेकात समन्वय ठेवून करा.
हँडवॉश, सॅनिटायझर पुरवण्याची व्यवस्था करा कोविड -१९ प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्र निर्जंतुकीकरण करून घेणे, रांगेत सामाजिक अंतर राखणे, हैंडवॉश, सॅनिटायझर पुरवणे आदी व्यवस्था करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने आयत्या वेळी येणा-या कामांचा विचार करुन या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तयार ठेवा. मतपत्रिका व मतदानाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य वेळेत प्राप्त करून घेऊन संबधिताच्या ताब्यात द्या.